पहिले प्रेमपत्र
मराठीचा तास असावा कदाचित, पण वर्ग शिक्षक कुठे होते? कुणास ठाऊक! वर्गात नुसता गोंधळ आणि दंगा चाललेला. कोणी आपापला अभ्यास करत होते तर कोणी दुसऱ्याची खोडी काढत होते, वाकुल्या दाखवण्यापासून ते वेण्या ओढे पर्यंत, पुस्तके ओढाताडी पासून तर शाळेचे दप्तर फाडे पर्यंत सर्व प्रकार अगदी मज्जेत चालू होते.
वर्गात शिक्षक नसल्याचा पुरेपूर आनंद घेण्यात आला होता. काही हुशार मुले -मुली एवढ्या गोंधळात सुध्दा शांत बसून पुस्तकात काहीतरी करत होती आणि काही अतिहुशार मुले स्वातंत्र्याचा स्वर्गीय आनंद उपभोगत होती.
चौथा, ब - वर्ग, तसा थोडा कोपऱ्यात असल्याने जरा दुर्लक्षित झाला असावा, नाही तर आता पर्यंत कोणीतरी सरांनी येऊन झोडपून काढला असतातच! वर्गात ४ रांगा - २ मुलींच्या, २ मुलांच्या. भारत - पाकीस्तान बॉर्डरपेक्षा पण जास्त सुरक्षा होती या मुलामुलींच्या बॉर्डरवर. एक मुलगा कि मुलगी इकडची तिकडे होणार नाही याचा अलिखित करार करून झालेला असावा.
मॅडम आता वर्गात येण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. तेवढ्यात एक वेगळीच गोष्ट वर्गात गुपचूप सुरु झाली, एक चिठ्ठी(अगदी चुरगळलेल्या कागदाची चिटोरीच होती ती... ) इकडून तिकडे जात होती. ज्याच्या हातात येईल तो, ती उघडायचा वाचायचा, फिदीफिदी हसायचा आणि न -राहवून दुसऱ्याला द्यायचा....मग दोघे पण हसायचे...क्रम चालूच होता.आता जवळपास सर्वच वर्ग तो कागदाचा तुकडा वाचून हसून-हसून कल्लोळ करत होता. तिने हळूच सर्वांची नजर चोरून मान वर केली, आधीच पुस्तक वाचता वाचता सर्व तिरक्या नजरेने पाहून झालेलेच होते तरीही...त्या कागदात काय आहे याची उत्सूकता तिला असे करायला भाग पाडत होती.
मागच्या मुलीला तिने हळूच विचारले "काय झाले ग?", ती खुद्कन हसली, हसली नसून खूप राग येईल असे चिढवत हसली,तिने नजर फिरवली तर आजूबाजूच्या सर्वच मुली हसत होत्या. तिला थोडं वेगळंच वाटलं, जणू काही तिलाच हसत होत्या. मग कुणीतरी ती चिठ्ठी तिच्या हातात दिली. चिट्टी कसली चुरगळलेला कागदाचं तो! तिने उघडला त्यामध्ये अतिशय घाणेरड्या अक्षरात वेडेवाकडे लिहिलेले वाचले....."अग आई!" हे काय लिहिले यात...." ----माझी बायको आहे", अर्थातच त्या जागी तिचे नाव होते!
यात काही वाईट आहे असे तिला वाटले सुध्दा नव्हते. पण सर्व लोकं खूप विचित्र नजरेने पाहून हसत होते...मग वाटले याचा अर्थ काही तरी चुकीचा होत असावा कदाचित. नेमके "बायको" म्हणजे काय हेच तिला नीटसे कळलेले नव्हते याला तुम्ही अज्ञान म्हणा नाही तर निष्पाप म्हणा!)
ती विचार करत होती, वर्गात तिच्यासारख्या नावाची आणखी पण एक मुलगी आहेच कि, कदाचित तिच्यासाठी असेल हे....... हे सर्व विचारचक्र चालू असताना तिच्या मैत्रिणी म्हणाल्या ,"ह्या मुलाने लिहिले आहे हे" , जा त्याला विचार का लिहिले, मॅडम आल्या कि मॅडमला नाव सांगेल वैगैरे वगैरे......त्या मुलाकडे पहिले (उगीच राग आला आहे असे दाखवत पण मुळात राग कशाचा आला आहे हे पण तिला कळत नव्हते ), आणि त्याच्या बाजूची मुले तर खुणेनी "हाच तो" असे सांगत होते, वा रे मैत्री! यालाच मित्र म्हणतात वाटते...
तो बिचारा बाजूच्या मुलांना धक्के देत होता आणि "मी नाही, मी नाही ", म्हणत हसत होता.....तिला खूपच वाईट वाटले. नक्की काय घडत आहे ते हि बहुदा कळत नव्हते तिला. मैत्रिणींच्या आणि त्याच्या मित्रांच्या जबरदस्त प्रतिक्रियेमूळे ती शेवटी उठली आणि त्याला विचारले,"काय आहे हे? मी तुझी बायको आहे का?"
बाकीचे dialogue मुलींनी सांगितल्या प्रमाणे बोलून घेतले..... तो मूर्ख मुलगा नुसता हसत होता...मुळात तो लाजत होता आणि थोडीशीच मानवर करून "मी नाही ,हा आहे.." असे बोलून परत मानखाली घालून हसत लाजत काहीतरी वेंधळट - बावळटासारखा वागत होता.
हा तर नवीनच विषय झाला, तिने त्या दुसऱ्या मुलाकडे गेली, त्याला पण आधीचेच सर्व dialogue बोलून घेतले. हे महाशय थोडे धीट होते, त्यांनी परत आधीच्या मुलाकडे बोट दाखवले...आता मात्र तिचा पारा चढला होता. काय करू नि काय नाही कळत नव्हते. त्यात हि सर्व मूर्ख मुले - मुली आणि त्यांची मिश्कील हसरी नजर...मागे कोपऱ्यात उठलेला एक हास्याचा कल्लोळ आणि अर्धा उठून उभा राहिलेला मुलामुलींचा गरका !
तेवढ्यात वर्गात मॅडम आल्या...सर्व पांगलेली मंडळी आपापल्या जागे वर जाऊन बसली. जणूकाही झालेच नव्हते असे भासवत, आपापल्या पुस्तकात डोकी अशी घालून बसली जसे मागच्या एका तासात वर्गात फक्त अभ्यासच चालू असावा!
ती हि परत जागेवर गेली मुलं -मुलींची अदृश्य बॉर्डर क्रॉस करून आणि वही उघडून वाचत बसले....डोक्यात मात्र काहूर उठले होते विचारांचे,
झालेल्या प्रकाराचे आणि त्या मूर्ख मुलाचे ...आता मॅडमला सांगू का? किव्हा घरी गेल्यावर बाबांना सांगू किव्हा......काय..... काय माहीती. असंख्य प्रश्न आणि विचार असलेले डोके वर करूनही बघावे एवढी सुध्दा हिम्मत नसलेली ती... असे भासवत होती जणू तिला काही वाटलेच नाही !!!!
Comments
Post a Comment